शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०१०

जिजावूंची सत्वपरीक्षा (निमित्त दादोजींचा पुतळा हलवणे वगैरे वगैरे....)

स्वर्गात चालता चालता जिजावूना  सीतामाई भेटल्या
कल्पवृक्षाच्या पारावर बसून दोघी हितगुज करू लागल्या

'खालचा प्रकार कळला आणि मी धावत धावत आले
जुने झाले तरीही माझे अनुभव, गाठीशी असलेले बरे'

'बर झाल माई तू भेटायला आलीस
तुझ्यापुढे माझे दुःख काहीच नाही' 

सीतामाई खिन्नपणे हसली आणि बोलली शून्यात पाहून
'चिरंतन अविश्वासाच्या यज्ञात किती समिधा जाणार जळून
आधी अग्निदिव्यात जाळली,  नंतर टाकली वनात,
तरीही जिवंत राहिले  म्हणून बसविली गाभाऱ्यात'

'माई, तरी तुझ बर होत, तू त्यांच्यासमोर होतीस
तुला पोटात घ्यायला तुझी आई, स्वतः जमीन होती
स्वर्गात बसून चारित्र्याचा, खटला आता लढते आहे
हिंदवी स्वराज्यापेक्षाही, कुंकवाची पुण्याई सांगते आहे
आपल्याच मुलांचं अधःपतन कुठवर सहन करायचं
पुतळ्याच्या राजकारणावर आपल्याच आईच शील जाळायच?'

अश्रू डोळ्यातले पुसून सीतामाई बोलली मनापासून
'ही चूक माझीच आहे,
हजारो वर्षे जुनीच आहे 
म्हणूनच सीता जिजामाता 
सत्वपरीक्षा देत आहेत
ही चूक माझीच आहे,
हजारो वर्षे जुनीच आहे 
अग्निदिव्यात जळता जळता
आले होते एकदा मनात
रामालाही ओढावे का हाताला धरून
जळायला आत
तोही राहिला नव्हता का,
असाच एकटा वनात?'