रविवार, २६ एप्रिल, २०१५

भूकंप

पोटाची भाकर झोपेची साखर 
गाडली गेली ती अभागी पाखर 
सगेही गेले आता मृत्यूच सोयरा 
मर्तीकाला फुटे गर्दीचा धुमारा 

राख झाला हिरवा संसार 
दुर्दैवाचे सारे दशावतार 
भोगले सारे भोगुनी उरले 
मराठवाड्याचे दैन्यच सरले 

अबबबब ब केवढा जमला हा पसारा 
मेल्यावरच पाझरे माणुसकीचा झरा 
काय सांगू या दरबाराची कथा 
फक्त टोपलीत आमच्या व्यथा 

साऱ्या आयुष्याची झाली माती 
मातीमध्येच मरण आले हाती 
आभाळच फाटले कसा शोधू निवारा 
जमीनच देईना तिच्या लेकरा आसरा 

धनी म्हणे आता काही नको शोधू 
मेल्या पोरीमध्ये उगा जीव ओतू 
तिच्या जन्माचं तर सोन झालं 
जगण्यापरी त्यान बोलावलं  

- राहुल गुणे 

(नेपाळ भूकंप आणि किल्लारी भूकंप या घटना जरी वेगळ्या असल्या तरी मूळ वेदना एकाच आहे …किल्लारीच्या भूकंपानंतर २ दिवसांनी (२ ऑक्ट १९९३) लिहिलेली हि कविता सहज आठवली म्हणून टाकतो आहे ….  )

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

मराठी माणूस



सदाशिवरावभाऊनी दिल्लीचे तख्त फोडल्याच्या आनंदाला 
पानिपतचा पराभव विरजण लावतो 
संयुक्त महाराष्ट्राचा कलश डोक्यावर घेऊन नाचताना 
बेळगाव कारवार चा डाग मनामध्ये सलतो  

मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

चर्चगेट लोकलच्या दांडीला लोंबकळून डुलकी काढताना 
चढलेल्या सेन्सेक्सच्या गप्पा मी फक्त ऐकतो 
चिरंजीवांच्या गणिताच्या प्रगतीचा उतरत आलेख बघताना 
भविष्यातल्या नोकरीच्या चिंतेने रात्ररात्र जागवतो 

 मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

मेनूकार्डावर काहीही न लिहिणाऱ्या उडप्याकडे मी पाठ फिरवतो 
आणि माझ्यापरीने महाराष्ट्रधर्म जागवतो 
तांबे-चितळे-पणशीकर यांच्याकडे हट्टाने खरेदी करताना 
पाट्या सूचना अपमानातून मराठी बाण्याचे धडे गिरवतो 

मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

धीरूभाई अंबानींचे चरित्र मी विकत घेऊन वाचतो 
शेजारचा शहा त्याचे परीक्षण माझ्याकडून ऐकतो 
दिवाळीच्या लाक्षामिपूजानाला तो दहा हजाराची लड लावतो 
मी लवंगी फटका एक एक उडवतो 

मराठी मराठी माणूस दुसरा काय असतो …

सचिन शून्यावर आउट झाला तरी तो सर्वश्रेष्ठच असतो 
मराठी हद्दपार झाली तरी मी मुंबईवर प्रेम करतो 
सातासमुद्रापलीकडे अटटाहासाने जमून मंडळ संस्था काढतो 
छोटे छोटे प्रश्न तत्वाचे बनवत ई-मेल वरून वाद घालतो 

मराठी मराठी माणूस आणखी वेगळा काय असतो …

शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

- मीही कधीकधी


वेळ गाठण्याच्या नादात आजकाल 
तोडतो सिग्नल मीही कधीकधी 
परिस्थितीच्या रेट्याला शरण जाताना 
प्रवाह पतित होतो मीही कधीकधी 

पेपर वाचताच रद्दीत घालताना 
वर्तमानाशी संबंध तोडतो मीही कधीकधी 
उड्डाण पुलावरून भरधाव वेगात जाताना 
खालच्या जगाकडे दुर्लक्ष करतो मीही कधीकधी 

सण साजरे करण्याच्या जोशात 
देवालाच विसरतो मीही कधीकधी 
धूळवडीचे रंग उत्साहात उधळताना 
आरशाला विसरतो मीही कधीकधी 

वेगवेगळ्या वादांच्या कोलाहलात 
संवाद विसरतो मीही कधीकधी 
अत्माग्लानीच्या नशेमध्ये जगताना 
आत्मभान विसरतो मीही कधीकधी 

राहतो जरी माणसांच्या जगात 
माणसालाच विसरतो मीही कधीकधी 
जगण्यासाठी श्रमण्याच्या नादात 

जगणेच विसरतो मीही कधीकधी