शुक्रवार, २४ एप्रिल, २०१५

- मीही कधीकधी


वेळ गाठण्याच्या नादात आजकाल 
तोडतो सिग्नल मीही कधीकधी 
परिस्थितीच्या रेट्याला शरण जाताना 
प्रवाह पतित होतो मीही कधीकधी 

पेपर वाचताच रद्दीत घालताना 
वर्तमानाशी संबंध तोडतो मीही कधीकधी 
उड्डाण पुलावरून भरधाव वेगात जाताना 
खालच्या जगाकडे दुर्लक्ष करतो मीही कधीकधी 

सण साजरे करण्याच्या जोशात 
देवालाच विसरतो मीही कधीकधी 
धूळवडीचे रंग उत्साहात उधळताना 
आरशाला विसरतो मीही कधीकधी 

वेगवेगळ्या वादांच्या कोलाहलात 
संवाद विसरतो मीही कधीकधी 
अत्माग्लानीच्या नशेमध्ये जगताना 
आत्मभान विसरतो मीही कधीकधी 

राहतो जरी माणसांच्या जगात 
माणसालाच विसरतो मीही कधीकधी 
जगण्यासाठी श्रमण्याच्या नादात 

जगणेच विसरतो मीही कधीकधी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा