रविवार, २६ एप्रिल, २०१५

भूकंप

पोटाची भाकर झोपेची साखर 
गाडली गेली ती अभागी पाखर 
सगेही गेले आता मृत्यूच सोयरा 
मर्तीकाला फुटे गर्दीचा धुमारा 

राख झाला हिरवा संसार 
दुर्दैवाचे सारे दशावतार 
भोगले सारे भोगुनी उरले 
मराठवाड्याचे दैन्यच सरले 

अबबबब ब केवढा जमला हा पसारा 
मेल्यावरच पाझरे माणुसकीचा झरा 
काय सांगू या दरबाराची कथा 
फक्त टोपलीत आमच्या व्यथा 

साऱ्या आयुष्याची झाली माती 
मातीमध्येच मरण आले हाती 
आभाळच फाटले कसा शोधू निवारा 
जमीनच देईना तिच्या लेकरा आसरा 

धनी म्हणे आता काही नको शोधू 
मेल्या पोरीमध्ये उगा जीव ओतू 
तिच्या जन्माचं तर सोन झालं 
जगण्यापरी त्यान बोलावलं  

- राहुल गुणे 

(नेपाळ भूकंप आणि किल्लारी भूकंप या घटना जरी वेगळ्या असल्या तरी मूळ वेदना एकाच आहे …किल्लारीच्या भूकंपानंतर २ दिवसांनी (२ ऑक्ट १९९३) लिहिलेली हि कविता सहज आठवली म्हणून टाकतो आहे ….  )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा